सावंत भोसल्यांची कुलस्वामिनी श्री भवानी व्यानमता
महाराष्ट्रात ‘सावंतभोसले’ आडनावांचा शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठा समाज हा प्रामुख्याने कोकणात बहुतांशी गावांमध्ये वसलेला आहे. आज रोजीरोटीसाठी मुंबई शहर व आजूबाजूच्या महानगरांमध्ये सावंत भोसले समाज मोठया प्रमाणात वास्तव्यास आहे.
कोकणात सावंतवाडी तालुक्यामध्ये कुणकेरी गावात या सावंत भोसल्यांची कुलस्वामिनी श्री भवानी व्यानामाता देवी श्री शशिकांत सावंत ह्यांच्या देवघरात आहे. सावंत भोसल्यांचा उगम थेट शिवाजी महाराज्यांपर्यंत मानला जातो. सावंत भोसल्यांचा पूर्वज आंबोली घाटमार्गे कुणकेरीत उतरला व तेथे स्तायिक झाला. महाराष्ट्रात सर्वदुरपर्यन्त असलेली सावंत भोसले मंडळी दरवर्षी नित्यनेमाने आपल्या कुलस्वमिनिच्या दर्शनाला येतात.
दर तीन वर्षांनी आपल्या कुलस्वामिनी भवानी व्यानमातेचा ‘गोंधळ’ सावंत भोसले मंडळी एकत्र येउन घालतात. गोंधळाच्या दिवशी सकाळीच सर्वप्रथम देवीची यथासांग पूजा करून देव उभा केला जातो. देव उभा करणे म्हणजे मानकऱ्याच्या अंगात देवीची शक्ती संचारणे. खरतर भवानी व्यानमाता देवी ही गोडी, तिला गोड शाकाहारी नैवेद्य दाखवितात. पण मानाचा बकरा खरतर देवीचे गण जे राक्षशी प्रवृत्तीचे आहेत, त्यांना शांत करण्यासाठी मानवला जातों. नंतर इतर नवसाचे बकरे मानवले जातात. ज्यांनी कुणी देवीला बकऱ्याचा नवस बोलले असतील ते कुणकेरीला आगाऊ कळवून नवसाचे बकरे उपलब्ध करून ठेऊ शकतात.
मानाचा बकरा मानविल्यानंतर त्या बकऱ्याचे शीर व पुढचा उजवा पाय कापून बकऱ्याच्या तोंडात ठेवून पूजेला ठेवले जाते. बकऱ्याच्या या मुन्डीला खुरी मुंडी असे संबोधिले जाते.
नंतर इतर नवसाचे बकरे मानविले जातात. त्यानंतर ओटीभरणीचा कार्यक्रम सुरु होतो. गोंधळास आलेल्या सुवासिनी महिला कुलास्वमिनीसमोर ओट्या भारतात. उपस्थित भाविकांसाठी सकाळी शाकाहारी जेवणाचा बेत असतो तर संध्याकाळी ४ वाजल्या पासून मांसाहारी महाप्रसादास सुरवात होते.
सकाळपासून गोंधळ घालण्यासाठी आलेले गोंधळी तालासुरात उदे ग अंबे उदे गात कवड्यांची माळ लावलेले तुणतुणे व संबळ वाजवीत असतात. नंतर कवड्यांची माळ ते देवीची शक्ती संचारलेल्या मानकऱ्याच्या गळ्यात घालतात. सायंकाळी सात च्या दरम्यान गोंधळाचा मांड उभारला जातो. पाच उसाचे खांब चार कोन व एक बाजूस उभे करून मांड उभारतात. आता उभारलेल्या मांडाची व पुन्हा एकदा देवीची यथासांग पूजा केली जाते. गोंधळी लोकांनी गोंधळ घालावयास सुरुवात केली की पुन्हा एकदा मानकऱ्याच्या अंगात देवी ची शक्ती संचारते. प्रमुख मानकरी दिवटी पेटवून देवीची शक्ती संचारलेल्या मानकऱ्याच्या (कुढीच्या) हातात देतात. ती दिवटी मांडाभोवती फिरवत प्रदक्षिणा घातली जाते. ह्या प्रदक्षिणेत काही उपस्थित भाविक भाग घेतात. गोंधळी तुणतुणे, संबळ वाजवत देवीचे स्तुती गातात . अंबेच्या नावाचा गजर होत राहतो. खरतर संबळाच्या नादासुरानेच देवीची शक्ती संचारते असे म्हणतात. ह्या शक्ती समोर उपस्थित असले भाविक आपले प्रश्न मांडतात, प्रश्न सोडवितात, नवस बोलतात, गाऱ्हाणे घालतात, मांडासमोर भाविक आणलेले गोड पदार्थ अर्पण करतात आणि ओट्या भारतात.
रात्री उशिरापर्यंत गोंधळी पौराणिक कथा सांगायला सुरवात करतात. उपस्थित भाविक मोठ्या भक्तिभावाने ह्या कथेचे श्रवण करतात. कथासार वाचन रात्रभर चालते. पहाटेच्या सुमारास गोंधळी पूर्वजांची नावे सांगण्याचा कार्यक्रम सुरे करतात. हा कार्यक्रम खूप मजेशीर आहे. भाविक आपल्या पूर्वजांच्या नावाने गोंधळीच्या हातात दान म्हणून पैसे देतात व गोंधळी तालासुरात, संबळ वाजवीत अमक्या अमक्याने त्यांच्या (आजोबाच्या / पणजोबाच्या) तमक्या तमक्याच्या नावाने दान दिले. आश्चर्याचा भाग म्हणजे गोंधळी केवळ बोटाच्या हालचालीच्या खुणेने सांगत असलेली नावे खरी ठरतात व त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता अधिकच वाढते.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घराशेजारील एका जुन्या झाडासमोर देवी शक्ती सोडते. तेथे दिवट्या विझविल्या जातात. नंतर घरी येउन देवघरात आरती केली जाते व गोंधळ कार्यक्रम समाप्ती होते.